RPI Protest on SC Sub Classification
केज : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने सोमवारी (दि. २७) केज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून राज्य शासनाचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या निर्देशानुसार तसेच युवा प्रदेशाध्यक्ष व बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
आंदोलनकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जातींचे अ, ब, क आणि ड अशा गटांत उपवर्गीकरण करण्याचा शासनाचा निर्णय असंवैधानिक असून, त्यामुळे समाजात फूट पडून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी, आरक्षणातील उपवर्गीकरण हा सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. समाजात फूट पाडण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसून, शासनाने निर्णय मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, ज्येष्ठ नेते दिलीप बनसोडे आणि आयटी सेलचे अध्यक्ष सूरज काळे यांनीही आपली भूमिका मांडत उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शविला.
निवेदनात शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, तसेच या विषयावर सोशल मीडियावर भडकावू आणि जातीय तेढ निर्माण करणारे संदेश, रील्स व पोस्ट प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सरवदे, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत हजारे, आयटी सेलचे अध्यक्ष सूरज काळे, युवा रिपाइचे निलेश ढोबळे, हरेंद्र तुपारे, विनोद गायकवाड, हरि गायकवाड, राहुल काळे, सचिन मस्के, संतोष कोकाटे, रोहित बचुटे, जय जोगदंड, शरद धीवर, चंद्रकांत गलांडे, सुनील धीवर, उत्कर्ष काळे, विनोद काळे, लखन गायकवाड, त्रिभुवन दुनघव, रितेश हजारे, विकास, शाम गुळवे, राहुल माने, बाळासाहेब जानराव यांच्यासह रिपाइचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.