online fraud pudhari photo
बीड

Beed Online Shopping Fraud : फेसबुकवर साड्यांची ऑर्डर देणे पडले महागात! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेला ८ लाखांचा गंडा

सायबर पोलिसांकडून १.९९ लाख रुपये होल्ड

पुढारी वृत्तसेवा

बीड : फेसबुकवर साड्यांची ऑनलाइन खरेदी करण्याच्या नादात परळी येथील ७१ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेला तब्बल ८ लाख ६४ हजार ९२४ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. साड्यांच्या डिलिव्हरीच्या नावाखाली वेगवेगळी कारणे सांगून संबंधित महिलेची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बीड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे फसवणुकीतील १ लाख ९९ हजार ४६५ रुपये होल्ड करण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथील रहिवासी असलेल्या या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेने फेसबुकवरील 'DSR Sarees' या पेजच्या लिंकवरून दोन साड्यांची ऑर्डर दिली होती. त्यानंतर साड्यांची डिलिव्हरी करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. वेगवेगळी कारणे सांगून संबंधित व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादन केला.

या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने गेल्या तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या बँकांचे स्कॅनर व्हॉट्सॲपवर पाठवून महिलेला वारंवार पैसे पाठवण्यास भाग पाडले. अशा प्रकारे महिलेच्या बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, परळी शाखेतील खात्यांतून एकूण ८ लाख ६४ हजार ९२४ रुपये ९५ पैसे उकळण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे बीड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

१ लाख ९९ हजार रुपये केले होल्ड!

तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी तातडीने १९३० सायबर हेल्पलाइनवर तसेच संबंधित पोर्टलवर व्यवहारांची माहिती नोंदवून पुढील कार्यवाही केली. या प्रयत्नांमुळे आतापर्यंत फसवणुकीतील १ लाख ९९ हजार ४६५ रुपये होल्ड करण्यात आले आहेत. ही रक्कम नियमानुसार फिर्यादी महिलेला परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT