Beed rainfall pudhari photo
बीड

Beed rainfall : बीड जिल्ह्यावर बरसल्या पावसाच्या सरी

शेतकऱ्यांना दिलासा, पाणीटंचाईचा ताण काहीसा कमी

पुढारी वृत्तसेवा

कडा : बीड जिल्ह्यात शुक्रवारी अनेक भागांत पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. कडा परिसरासह जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, पेरणीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळणार असला, तरी जिल्ह्याला अद्यापही सरासरीइतक्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, तर लहान-मोठे नाले, ओढे वाहू लागल्याने जलसाठ्यांमध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे. विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि बाजरी या पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक गावांमध्ये पिकांना आवश्यक ओलावा मिळाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या प्रशासनालाही या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. टँकर, पाणीपुरवठा आणि जलसाठ्यांबाबत निर्माण झालेला ताण काही प्रमाणात कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र हा दिलासा तात्पुरता असून,जिल्ह्यातील धरणे आणि जलस्रोत भरावेत इतका व्यापक व सातत्यपूर्ण पाऊस अद्याप झालेला नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. आगामी काळात चांगला आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्यास खरीप हंगामाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे.

प्रकल्पातील पाणीसाठा तळालाच

शुक्रवारी अनेक भागांत चांगल्या सरी कोसळल्या असल्या तरी संपूर्ण जिल्हाभर अद्याप समाधानकारक आणि सरासरीइतका पाऊस झालेला नाही. अनेक भागांमध्ये केवळ तुरळक किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप पिकांची पुढील वाढ आणि जलसाठ्यांची स्थिती सुधारण्यासाठी येत्या काही दिवसांत मोठ्या पावसाची आवश्यकता असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT