Beed Rain News Pudhari Photo
बीड

Beed Rain News: मांजरा नदीचे रौद्ररूप; शेकडो एकर पिके पाण्याखाली, बळीराजा हवालदिल

Beed Rain latest news update: परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत उभ्या पिकांचा चिखल झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

मनोज गव्हाणे

नेकनूर: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या मांजरा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडून केज तालुक्यातील बोरगाव (बु.) परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत उभ्या पिकांचा चिखल झाला आहे. या अनपेक्षित संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

पिकांचे मोठे नुकसान, शेतात साचले तळे

गुरुवारी रात्रीपासून मांजरा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. नदीचे पाणी वेगाने काठच्या शेतांमध्ये घुसल्याने परिस्थिती गंभीर बनली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. या पुराच्या पाण्यामुळे खालील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेले सोयाबीनचे पीक कुजून जाण्याची भीती आहे. पाते आणि बोंडे लागलेला कापूस पाण्यामुळे सडून जाण्याच्या मार्गावर आहे. काढणीला आलेली ही पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांवर केलेला खर्च वाया गेल्याने आता पुढील हंगामाची चिंता त्यांना सतावत आहे.

सरकारने आमची दखल घ्यावी; शेतकऱ्यांनी मागणी

या नुकसानीबद्दल बोलताना बोरगाव येथील शेतकरी अशोक रमेश गव्हाणे यांनी आपली व्यथा मांडली. "गुरुवारी रात्री अचानक नदीचे पाणी शेतात शिरले. माझी चार एकर सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पिकाचे तर नुकसान झालेच, पण आता शेतातील सुपीक माती वाहून जाण्याची भीती वाटते. सरकारने आमची दखल घ्यावी," अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

पंचनाम्याची तातडीची मागणी

या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत आणि तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आणखी संकटात सापडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT