धारूर: तालुक्यातील अंजनडोह येथील नदीवरील पुलाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने एका व्यक्तीचा गाडीसह वाहून गेल्याने मृत्यू झाला. सदर व्यक्ति अडत व्यापारी असून, त्यांचे नाव नितीन शिवाजीराव कांबळे (वय 42 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बुधवारी (दि.२७) संध्याकाळी सुमारे आठ वाजता नितीन कांबळे हे रुई-धारूर येथून अंजनडोहकडे चारचाकी वाहनातून जात होते. दरम्यान, वान नदीवरील पुलावरून जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. या घटनेची माहिती मिळताच गावकरी, पोलीस व तहसील प्रशासनाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने शोध लावता आला नाही. दुसऱ्या दिवशी (२८ ऑगस्ट) सकाळी, ज्या ठिकाणाहून गाडी वाहून गेली त्या ठिकाणापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या बंधाऱ्याजवळ कांबळे यांचा मृतदेह अडकलेला आढळून आला. महसूल व पोलीस दलासह गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
या घटनेनंतर किल्ले धारूर चे तहसीलदार श्रीकांत निळे नायब तहसीलदार सुरेश पाळवदे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे सह पोलीस - महसूल प्रशासनाने नदी, नाले, ओढे पार करण्यापूर्वी पाण्याची पातळी सुरक्षित आहे की नाही याची खात्री करूनच प्रवास करावा. अनावश्यक धोका घेऊ नये, असे नागरिकांना आवाहन केले आहे. या दुर्घटनेने अंजनडोह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.