आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देताना आमदार भीमराव धोंडे  Pudhari
बीड

Punjabrao Dakh Police Complaint | पंजाबराव डखच्या चुकीच्या हवामान अंदाजांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; आ. भीमराव धोंडे यांची पोलिसांत तक्रार

सोशल मीडियावरील हवामान अंदाजांची सत्यता तपासण्याची मागणी; दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Punjabrao Dakh Weather Forecast

आष्टी : सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या पंजाबराव डख यांच्या चुकीच्या हवामान अंदाजांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार भीमराव धोंडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. संबंधित हवामान अंदाजांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात २७ नोव्हेंबर रोजी धोंडे यांनी आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन दिले. यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या हवामान अंदाजांची सत्यता आणि अचूकता तपासण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सोशल मीडियावरील हवामान अंदाजांवर विश्वास ठेवून शेतकरी पेरणी, काढणी तसेच शेतीविषयक अन्य निर्णय घेतात. मात्र, हे अंदाज चुकीचे ठरल्यास त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे संबंधित व्हिडिओ आणि संदेशांची अधिकृत व वैज्ञानिक माहितीच्या आधारे पडताळणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच, अशा अंदाजांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून त्यांच्याकडील पुरावे संकलित करावेत. हवामान अंदाज प्रसारित करणाऱ्या व्यक्तींची भूमिका तपासावी आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणाकडे पाठवावे, असेही धोंडे यांनी नमूद केले आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताशी निगडित असलेल्या या विषयाची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT