Beed Pune bus service pudhari photo
बीड

Beed News : प्रवाशांवर एसटी बसला धक्का देण्याची वेळ!

कडा शहरात घडलेला प्रकार : लांब पल्ल्याच्या मार्गावर नादुरुस्त बसेस

पुढारी वृत्तसेवा

कडा : गरिबांची ‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या कारभाराचा सोमवारी कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणे विभागातील पिंपरी-चिंचवड आगाराची बीड-पुणे फलक असलेली एसटी बस चौकातच बंद पडली.

बस सुरू होऊन पुढे सरकत नसल्याने अखेर प्रवाशांसह वाहकालाच बस खाली उतरून धक्का देण्याची वेळ आली. या घटनेमुळे एसटी बसच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कड्यातील प्रमुख चौकात वाहतूक सुरू असतानाच बीड-पुणे मार्गावरील ही एसटी बस अचानक बंद पडली. चालकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र बस पुढे सरकत नसल्याने प्रवाशांना खाली उतरावे लागले. त्यानंतर प्रवासी आणि वाहकाने मिळून बसला धक्का देत ती रस्त्याच्या बाजूला किंवा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांकडून बसला धक्का देण्याचा हा प्रकार पाहून रस्त्यावरून जाणारे नागरिकही काही काळ थांबले.

तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरच बंद पडलेली एसटी बस ढकलण्याची वेळ येणे, ही बाब प्रवाशांमध्ये संताप निर्माण करणारी ठरली.एकीकडे एसटी महामंडळाकडून प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि वेळेत प्रवासाची सुविधा देण्याचे दावे केले जातात. मात्र, दुसरीकडे बसची तांत्रिक स्थिती समाधानकारक नसल्याने रस्त्यातच बस बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही जीवनवाहिनी मानली जाते.

विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा एसटी सेवेवर मोठा आधार आहे. मात्र, बसची नियमित देखभाल होत नसेल आणि प्रवासादरम्यानच बस बंद पडत असतील, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी उपस्थित केला.

एसटी प्रशासनाने केवळ तिकीट वसुलीवर भर न देता बसची नियमित तपासणी, देखभाल आणि तांत्रिक स्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रवाशांनाच बसला धक्का देण्याची वेळ येणे ही केवळ गैरसोय नसून एसटीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. संबंधित आगाराने या घटनेची दखल घेऊन बसच्या तांत्रिक स्थितीची चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

नव्या कोऱ्या जिजाऊ बसेस जवळच्या मार्गावर!

बंद पडलेली बस ही पुणे विभागातील असली तरी बीड जिल्ह्यातही वेगळी परिस्थिती नाही. लांब पल्ल्याच्या मार्गावर जुन्या बसेस सोडल्या जात आहेत तर नव्या कोऱ्या जिजाऊ बसेस जवळच्या मार्गावर सोडल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून बीड एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांचा यामागचा नेमका उद्देश काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT