बीड : चार दशकांहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेल्या बीड रेल्वे प्रकल्पाला आता निर्णायक टप्पा गाठण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या वर्षी मराठवाडा मुक्तिदिनी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाल्यानंतर यंदाच्या १७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
बीड–परळी रेल्वेमार्गाच्या प्रगतीचा स्वतंत्र आढावा घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या प्रकल्पाच्या उर्वरित कामाला गती देण्याच्या सूचना देतानाच राज्य सरकारकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. बीड जिल्ह्याच्या रेल्वेचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून या प्रकल्पाला गती मिळाली. त्याच प्रयत्नांचे फलित म्हणून १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड-अहिल्यानगरदरम्यान पहिली रेल्वे धावली आणि बीडकरांचे चार दशकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.
दरम्यान, बीड ते वडवणी या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून चाचणीही यशस्वीरीत्या पार पडली आहे. आता वडवणी ते परळी या उर्वरित टप्प्याचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. हा संपूर्ण रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्याच्या विकासाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बीड–पुणे रेल्वे सुरू झाल्यास जिल्ह्यातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, उद्योग क्षेत्र तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा मराठवाडा मुक्तीदिन बीडकरांसाठी आणखी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
राज्यसरकारकडून निधी व समन्वयात कोणतीही कमी राहू देणार नाही : सुनेत्रा पवार
"बीडच्या रेल्वेसाठी स्वर्गीय अजितदादांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न केले. हा प्रकल्प त्यांच्यासाठी केवळ विकासकाम नव्हता, तर बीडकरांना दिलेला शब्द होता. यंदाच्या मराठवाडा मुक्तिदिनी बीड–पुणे रेल्वे सुरू करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. ही रेल्वे प्रत्यक्ष धावू लागली, तर ती स्व. अजित पवार यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी आणि समन्वयात कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.''