Beed Pune railway service pudhari photo
बीड

Beed Pune railway service : बीड ते पुणे रेल्वेचा आज ऐतिहासिक शुभारंभ!

चाळीस वर्षांच्या प्रतीक्षेचा गोड शेवट; ऐन सणासुदीत बीडकरांना मोठे गिफ्ट

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीड जिल्ह्याच्या विकासाच्या इतिहासात १७ सप्टेंबर हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा ठरत आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे अत्यंत औचित्य साधून बीड जिल्हावासीयांचे तब्बल चाळीस वर्षांचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरत आहे. 'बीड ते पुणे' या थेट रेल्वे सेवेचा ऐतिहासिक शुभारंभ आज होत असून, या रेल्वेमुळे बीडकरांचा प्रवासाचा मार्ग आता अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

बीडचे तत्कालीन पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी जिल्हावासीयांना दिलेला शब्द त्यांच्या पश्चात राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पूर्ण केला आहे. या रेल्वे सेवेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून ऐन सणासुदीच्या काळात बीडकरांना हे मोठे 'दिवाळी गिफ्ट' मिळाले आहे.

बीड जिल्ह्याला रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी गेल्या चार दशकांपासून संघर्ष सुरू होता. 'रेल्वे कृती आंदोलन समिती'च्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक आंदोलने, मोर्चे आणि उपोषणे झाली. पूर्वीच्या काळात केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी केवळ तुटपुंजा निधी मिळायचा, ज्यामुळे कामाचा वेग अत्यंत मंद होता.

मात्र, स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे महत्त्व ओळखून सुमारे चार हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद जाहीर केली. या प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनानेही कोकण रेल्वेच्या धर्तीवर ५० टक्के आर्थिक वाटा उचलण्याचे महत्त्वपूर्ण धोरण स्वीकारले. केंद्र व राज्याच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे रेल्वेचे काम ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण होऊन आज प्रत्यक्षात रेल्वे रुळावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी बीड ते अहिल्यानगर (अहमदनगर) दरम्यान यशस्वी रेल्वे चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर या मार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू झाली. आता त्यापुढचे सर्वात महत्त्वाचे आणि प्रतीक्षित पाऊल म्हणजे थेट 'बीड ते पुणे' रेल्वे धावणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी गती देणारा ठरेल.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पंकजा मुंडे दाखवणार हिरवा झेंडा

या ऐतिहासिक प्रवासाचा प्रारंभ करण्यासाठी बीड रेल्वे स्थानकावर भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पंकजा मुंडे या प्रमुख उपस्थित राहून रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सणासुदीच्या काळात चाकरमानी व विद्यार्थ्यांची मोठी सोय

सध्या गणेशोत्सव सुरू असून लवकरच नवरात्र आणि दिवाळीचे सण येत आहेत. अशा सणासुदीच्या काळात खाजगी ट्रॅव्हल्स आणि एसटी गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, तसेच ट्रॅव्हल्सचे तिकीट दरही गगनाला भिडलेले असतात. अशा वेळी थेट पुणे रेल्वे सुरू झाल्याने पुण्यामध्ये शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची मोठी सोय होणार आहे. प्रवाशांचा वेळ आणि पैसा या दोन्हीची मोठी बचत होणार असल्याने बीडकरांमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT