Crime pudhari photo
बीड

Beed Crime : बीडमध्ये प्राध्यापक डॉक्टरकडून वैद्यकीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

मार्क कमी देण्याची; ५ वर्षे एकाच वर्गात ठेवण्याची धमकी

पुढारी वृत्तसेवा

बीड : विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या प्राध्यापकाकडूनच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनीने प्राध्यापक डॉक्टरविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

उपचाराच्या बहाण्याने संबंधित डॉक्टरने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप असून हा प्रकार कुणाला सांगितल्यास परीक्षेत कमी गुण देण्यासह पाच वर्षे एकाच वर्गात ठेवण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉ. अनिस अहमद याला ताब्यात घेऊन नोटीस बजावली आहे.

पीडित विद्यार्थिनी पीसीओडीच्या त्रासावर नियमित तपासणी आणि उपचारासाठी महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेली होती. यावेळी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिस अहमद याने तिच्याशी लगट करून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. जानेवारी २०२६ पासून उपचाराच्या बहाण्याने हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गेल्या ११ महिन्यांत तीन ते चार वेळा आरोपीने गैरवर्तन केल्याचा आरोपही तिने केला आहे.

शैक्षणिक नुकसान करण्याची दिली धमकी

या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी आरोपीकडून दिली जात असल्याचा दावा विद्यार्थिनीने केला आहे. परीक्षेत कमी गुण देईन, पाच वर्षे एकाच वर्गात ठेवीन, अशी भीती दाखवण्यात आल्याने तिने सुरुवातीला हा प्रकार सहन केला. मात्र, अखेर धैर्य एकवटून तिने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठत संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर मांडला. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. अनिस अहमद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT