Pravin Sonawane family government financial aid
कडा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपले जीवन संपवणारे आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील तरुण प्रवीण दिलीप सोनवणे यांच्या कुटुंबाला अखेर शासनाकडून मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झालेला दहा लाख रुपयांचा धनादेश (चेक) प्रवीण सोनवणे यांच्या मातोश्री सुनंदा दिलीप सोनवणे यांच्याकडे आष्टी येथील तहसील कार्यालयात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी प्रवीण सोनवणे यांनी दि.१७ मार्च २०२४ रोजी आपले जीवन संपवले होते. त्यांच्या या बलिदानानंतर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी लावून धरली होती. त्यांच्या या संघर्षामुळे आणि पाठपुराव्यामुळेच सोनवणे कुटुंबाला ही मदत मिळवणे शक्य झाले आहे.
यावेळी आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार भगीरथ धारक, शेरी बु गावचे उपसरपंच दिपक सोनवणे आणि मनोज सुनील रेडेकर, पत्रकार अविनाश कदम, संतोष सानप आदी उपस्थित होते. या मदतीमुळे सोनवणे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.