बीड

Beed news | आमच्या नेत्याला आमदार करा

बीडमध्ये समर्थकांकडून होतेय मागणी; कोणाची लॉटरी लागणार?

पुढारी वृत्तसेवा

उदय नागरगोजे

बीड : विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या नऊ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. ३० एप्रिल हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून या नऊ जागांवर अनेकांचे लक्ष लागले आहे. यात बीडचे कार्यकर्ते कसे मागे राहणार? त्यांनी देखील आपल्या नेत्याला आमदार करावे, अशी मागणी करण्यास प्रारंभ केला आहे. याबरोबरच प्रसिद्धी पत्रकातून देखील दावे केले जात असून, यामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नावाची चर्चा होत आहे.

विधानसभेत असणाऱ्या संख्याबळानुसार विधानपरिषद निवडणुकीत ९ जागांपैकी ५ जागा भाजपच्या वाट्याला, २ जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, १ जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीतील तीन पक्षांत मिळून एक जागा मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाजप, शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या बीडमधील नेत्यांकडून पक्षीय पातळीवर मोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे आपला नेता या स्पर्धेत मागे राहू अशी काळजी कार्यकर्ते घेत आहेत. यातूनच गेवराईचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत.

परंतु राष्ट्रवादीकडूनच विजयसिंह पंडित हे विधानसभेतील आमदार आहेत, त्यामुळे अमरसिंह पंडित यांना संधी मिळू शकेल का, असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबरोबरच गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांकडून तर आमदारकी फिक्स असल्याबाबतच्या पोस्ट केल्या जात आहेत. परंतु क्षीरसागर यांना नेमक्या कोणत्या पक्षाकडून संधी मिळणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे. कारण क्षीरसागर गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यांचा हा प्रवेश अद्यापही प्रलंबित राहिलेला असताना आता नव्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश आणि आमदार नक्की असल्याचे काही कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत आहेत.

तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनाही संधी मिळावी अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. शिवसेनेचे बीड जिल्हा संघटक सुनील सुरवसे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक दिले असून अनिल जगताप यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतात आणि बीडमधून कोणाला संधी मिळून आणखी एक विधान परिषदेवरील आमदार बीडला मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेला आमदारकीचा बुस्टर हवा!

बीडमध्ये शिवसेनेच्या हक्काची जागा विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी देण्यात आली होती. त्यामुळे बीड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा एकही आमदार नाही. पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत बीडमध्ये अनिल जगताप यांच्यासारख्या नेत्याला विधानपरिषदेवर संधी मिळाली तर पक्ष संघटन वाढीसाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. अशा पद्धतीने पक्षाकडे आपले मत कळवले असल्याची माहिती देखील जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली असून शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो मान्य असेल असे देखील जगताप यांनी म्हटले आहे.

जाधव यांच्याकडून पंडितांसाठी पोस्ट!

बीडमधील सीए तथा विविध सामाजिक आंदोलनात सक्रिय असलेले बी. बी. जाधव यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट केली आहे. यामध्ये अभ्यासू नेतृत्व, विकासाचा दृष्टिकोन, अभ्यासू भाषणाने समाजाचे प्रश्न मांडून न्यायासाठी झगडणारे माजी आमदार अमरसिंह पंडित यांना विधान परिषदेच्या माध्यमातून संधी मिळावी अशी मागणी करत तुम्ही-आम्ही बीडकर असा उल्लेख जाधव यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT