मल्हार कुंडकर
माजलगाव : अधिक मासानिमित्त तीर्थक्षेत्र पुरुषोत्तम पुरी येथे भगवान पुरुषोत्तमांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या माजलगाव तालुक्यात आल्या होत्या. मात्र त्यांच्या या धार्मिक दौऱ्यादरम्यान भाजपमधील स्थानिक गटबाजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. माजलगाव विधानसभा मतदारसंघात प्रवेश करताच विविध ठिकाणी लागलेले स्वतंत्र स्वागत फलक, बॅनर आणि वेगवेगळ्या गटांकडून करण्यात आलेले स्वागत यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पंकजा मुंडे यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील विविध कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी केली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वागताचे फलक आणि बॅनर झळकत होते. मात्र हे स्वागत एकसंघ स्वरूपात दिसून आले नाही. विविध गटांनी स्वतंत्रपणे बॅनरबाजी करत आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विशेषतः भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले आणि विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले माधव निर्मळ यांनी आपल्या समर्थकांसह मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत पंकजा मुंडे यांचे स्वागत केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या गटाची उपस्थिती ठळकपणे जाणवत होती.
दुसरीकडे, भाजपमधील काही जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र माधव निर्मळ यांच्या गटात सहभागी झाले नाहीत. त्यांनी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून पंकजा मुंडे यांचे स्वागत केले. त्यामुळे पक्षातील दोन किंवा अधिक गट स्पष्टपणे सक्रिय असल्याचे चित्र दिसून आले. भगवान पुरुषोत्तम दर्शन दौऱ्याच्या निमित्ताने सर्व कार्यकर्ते एकत्र येतील, अशी परिस्थिती असताना प्रत्यक्षात प्रत्येक गटाने स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा व माजलगाव सह परिसरात सुरू आहे.
पुरुषोत्तम पुरी येथे दर्शन आणि आरती पार पडली असली तरी कार्यकर्त्यांमधील ही दरी अनेकांच्या नजरेत भरली. स्थानिक राजकारणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत समीकरणे बदलत असल्याचे संकेत या दौऱ्यातून मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्या दौऱ्यात धार्मिक कार्यक्रमांवर भर दिला असून कोणत्याही गटबाजीवर सार्वजनिक भाष्य केले नाही. मात्र त्यांच्या उपस्थितीतही स्थानिक कार्यकर्ते एकत्र न आल्याने मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या संघटनात्मक मजबुतीसाठी पक्ष नेतृत्व आगामी काळात या मतभेदांवर तोडगा काढणार का, याकडे कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
माजलगाव विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यानंतर आता पक्षातील गटबाजी आणि नेतृत्वाच्या प्रश्नावर नव्याने चर्चा सुरू झाली असून येत्या काळात स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.