आष्टी : आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एका शेतकरी कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. घराला कुलूप असल्याने कुटुंब बाहेरगावी गेले होते. मात्र पाळीव श्वानाच्या सततच्या भुंकण्यामुळे ग्रामस्थ सतर्क झाले आणि ही दुर्घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून लाखो रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. तर या आगप्रकरणी गावचे सरपंच जाधव, उपसरपंच फासले यांच्यासह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौलावडगाव येथील चर्मकार समाजाचे स्थानिक नेते गोपीनाथ गाडे हे मागील आठ दिवसांपासून कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या बंद घरातून धूर व ज्वाळा निघताना शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. घरासमोरील पाळीव श्वान सतत भुंकत असल्याने ग्रामस्थ जागे झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला कळवले. घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर अग्निशमन दल, अंभोरा पोलीस ठाणे तसेच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
संयुक्त प्रयत्नांतून आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत घरातील संसारोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक साहित्य, स्टेशनरी व इतर मालमत्ता पूर्णतः जळून खाक झाली होती. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके यांच्यासह पोलिसांनी भेट देत पंचनामा केला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच गाडे कुटुंबीय दौलावडगाव येथे दाखल झाले. राख झालेला संसार पाहून गाडे दाम्पत्याला मोठा मानसिक धक्का बसला.
आयुष्यभराची कमाई एका रात्रीत जळून गेली, अशी भावना त्यांनी व्यक्त करून ही आग जाणीवपूर्वक लावली असल्याचा आरोप गोपीनाथ गंगाधर गाडे यांनी केला असून त्यांनी या संदर्भात पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी गावचे सरपंच भरत पसराम जाधव, अशोक गुलाब इथापे माजी सभापती, उपसरपंच नंदकुमार रामदास फसले यांच्यासह इतरांनी मिळून ही आग लावली आहे असे आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
सरपंच जाधव, उपसरपंच फासले यांच्याविरुद्ध तक्रार
याप्रकरणी गोपीनाथ गंगाराम गाडे राहणार दौलावडगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी भरत पसराम जाधव विद्यमान सरपंच, अशोक गुलाब इथापे माजी सभापती, नंदकुमार रामदास फासले उपसरपंच, बबलू याकुब कुरेशी, बाळू जाधव, प्रवीण दशरथ जाधव, अंकुश सदाशिव गव्हाणे, जलील कुरेशी, भय्या आलम खान, संतोष काशिनाथ फसले, महादेव सर्जेराव कोहक, रा. दौलावडगाव, ता. आष्टी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.