शिरूर : चकलांबा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गेवराई तालुक्यातील मालेगाव (बु.) शिवारात गांजाच्या शेतीवर मोठी कारवाई केली. गट क्रमांक २४८ मधील शेतातून सुमारे ४२ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारमूल्याने किंमत १२ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे.
सपोनि संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त खबरीवरून ही कारवाई करण्यात आली. माहितीप्रमाणे, श्रीराम सुधाकर बने (रा. मालेगाव बु.) यांनी आपल्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाड टाकली असता शेतात गांजासदृश्य झाडे आढळून आली.
त्यानंतर गेवराईचे नायब तहसीलदार सुभाष कट्टे व मंडळ अधिकारी सुनिता राठोड यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. सर्व झाडे उपटून ४२ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी श्रीराम बने याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सपोनि संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील, तसेच पोलीस शिपाई अमोल येळे, कल्याण पवार, कैलास गुजर, हनुमान इंगोले, घोंगडे आदींचा सहभाग होता.