बीड

Beed news | पोलिस पाटील भरती : लेखी परीक्षा पारदर्शक

निकालातील गोंधळामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर

पुढारी वृत्तसेवा

धारूर : बीड जिल्ह्यात २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या पोलिस पाटील पदाच्या लेखी परीक्षेनंतर प्रशासनाने पारदर्शकतेचा ठाम दावा केला होता. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सुरुवातीपासूनच भरती प्रक्रिया गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या निकषांवर राबवली जाईल, असे स्पष्ट केले होते. परीक्षेरम्यान उमेदवारांना उत्तरपत्रिकांच्या कार्बन प्रती देण्यात आल्या, तसेच त्याच दिवशी उत्तरतालिका जाहीर करण्यात आली. या उपाययोजनांमुळे उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.

लेखी परीक्षा ८० गुणांची घेण्यात आली होती. निकाल २४ फेब्रुवारीला अपेक्षित असताना काही उपविभागांत तो विलंबाने जाहीर झाला. विशेषतः माजलगाव आणि पाटोदा उपविभागांत निकाल २५ फेब्रुवारीला उशिरा रात्री प्रसिद्ध करण्यात आला. माजलगावचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर अपलोड झाल्यानंतर काही वेळातच मागे घेण्यात आल्याने उमेदवारांमध्ये गोंधळ आणि संशय निर्माण झाला.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या यादीत विसंगती आढळल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे. ६० पेक्षा अधिक गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांची नावे मुलाखतीस पात्र यादीत नसल्याचे दिसून आले, तर तुलनेने कमी गुण मिळालेल्या उमेदवारांचा समावेश झाल्याचे आरोप करण्यात आले. यामुळे गुणवंत उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी अनेक उमेदवारांनी माजलगाव येथे उपविभागीय दंडाधिकारी गौरव इंगोले यांची भेट घेत स्पष्टीकरणाची मागणी केली. तसेच संबंधित परीक्षा एजन्सीवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT