केज : शहरात भररस्त्यात व्यापाऱ्याचा मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांपैकी एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली असून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
२३ मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास समता नगर भागातील व्यापारी बाळासाहेब सोपानराव घुले हे मोबाईलवर बोलत पायी आपल्या दुकानाकडे जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना अडवले आणि दरडावून त्यांच्याकडील १० हजार रुपयांचा मोबाईल आणि २ हजार रुपये रोख, असा एकूण १२ हजारांचा ऐवज बळजबरीने हिसकावून पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून हे कृत्य सराईत गुन्हेगार आवड्या उर्फ आवेज शेख आणि सोहेल मोहम्मद शेख (दोघे रा. केज) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. केज पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने तांत्रिक तपास करत २४ मार्चच्या रात्री आवेज उर्फ आवड्या खाजा शेख याला ताब्यात घेतले. त्याने आपल्या साथीदारासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
गुन्ह्यात वापरलेली 'रायडर' मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी सोहेल शेख हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.