बीड : येथील एका वस्तीगृहातून कोणालाही न सांगता निघून गेलेल्या मुलींना पुण्याला पोहोचायच्या आतच पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी सकाळी या मुली वस्तीगृहातून बाहेर पडल्या होत्या.
बीड शहरातील एका वस्तीगृहात राहत असलेल्या दोन अल्पवयीन मुली रविवारी सकाळीच कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास येतात त्यांनी तात्काळ वस्तीगृह गाठत तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला तसेच या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. यानंतर तातडीने कारवाई करत शिवाजीनगर पोलिसांनी इतर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची मदत घेत या मुलींना पुण्याला पोहोचण्याच्या आधीच ताब्यात घेतले.
दरम्यान आता या मुली कोणालाही न सांगता पुण्याला का जात होत्या, त्यांच्यासोबत आणखी कोणी होते का या सर्व प्रश्नांची उत्तरे मुली बीडमध्ये पोहोचल्यानंतरच मिळू शकणार आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय माधव काटकर, पीएसआय संकेत घुगे, अनिता खरमाटे वैशाली राख यांच्या टीमने केली.