फुलसांगवीत शॉर्टसर्किटने ३० एकर ऊस जळून खाक 
बीड

Beed Fire : फुलसांगवीत शॉर्टसर्किटने ३० एकर ऊस जळून खाक; ठिबक संचही आगीच्या भक्ष्यस्थानी

आग विझविण्यासाठी पाणीही नाही; महसूल विभागाकडून पंचनामा

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : गेवराई तालुक्यातील फुलसांगवी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल ३० एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत ऊसासोबतच ठिबक सिंचनाच्या पाईपांचेही मोठे नुकसान झाले. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक आणि सिंचनासाठी केलेली गुंतवणूक डोळ्यांदेखत जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ही घटना सोमवारी (दि.२६) दुपारी दीडच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, आग विझविण्यासाठी पाणीही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची हतबलता अधिकच वाढली. दरम्यान, महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.

फुलसांगवी शिवारातील गट क्रमांक २६३, २६५ आणि २७० मधील ऊसाला दुपारी अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऊसाच्या शेतात आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठ्या क्षेत्रावरील पीक काही वेळातच जळून खाक झाले. आगीच्या झळा ठिबक सिंचनाच्या पाईपांनाही बसल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले.

या आगीत विष्णू पंजाबापू तळेकर, दिलीप शंकरराव तळेकर, गंगाभिसेन रावसाहेब तळेकर आणि भाऊसाहेब नामदेव तळेकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळाला. ऊस उत्पादनासाठी केलेला खर्च, वर्षभर घेतलेली मेहनत आणि सिंचनासाठी उभारलेली व्यवस्था आगीत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

आग विझविण्यासाठी पाणीही नाही!

शेतात आग लागल्यानंतर ती विझविण्यासाठी धावपळ करण्यात आली. मात्र, परिसरात पाणी उपलब्ध नसल्याने आग आटोक्यात आणताना अडचणी निर्माण झाल्या. डोळ्यांदेखत ऊस जळत असताना तो वाचवण्यासाठी आवश्यक साधनांची कमतरता जाणवली. ऊसासोबत ठिबक पाईप जळाल्याने आगामी काळात सिंचनाची व्यवस्थाही पुन्हा उभारावी लागणार आहे.

या घटनेनंतर महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. मात्र, पंचनाम्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, हा प्रश्न आहे. संबंधित यंत्रणेने आगीच्या कारणाची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वर्षभर घाम गाळून वाढवलेले पीक आणि त्यासाठी केलेली गुंतवणूक काही क्षणांत राख झाल्याने फुलसांगवीतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऊस जळाला, ठिबक पाईप जळाले आणि हातात उरले ते केवळ नुकसान! आता शासनाने तातडीने मदत करून या संकटात शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT