बीड

परळी वैजनाथमध्ये जनक्षोभ; अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराविरोधात परळीत ‘रास्ता रोको’

आंदोलकांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि हत्येच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ सोमवार दि. ४ मे रोजी परळी वैजनाथ येथील छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पुण्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद आज परळीत उमटले असून, दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महसूल प्रशासना मार्फत निवेदन देण्यात आले.

सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला आणि तरुण एकत्र आले. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कोणत्याही परिस्थितीत दया न दाखवता भरचौकात फाशी द्यावी., प्रलंबित असलेला ‘शक्ती कायदा’ तात्काळ लागू करून अशा प्रकरणांची चौकशी ३० दिवसांत करून निकाल ९० दिवसांत लावण्यात यावा असा नवीन कायदा करावा., पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवावा., शहरात आणि ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अशा घटनांतील आरोपींना कठोर शासन व्हावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन महसूल प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT