Parli Municipal Council budget 2026
परळी वैजनाथ : परळी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा २९३ कोटी ३० लाख ३३ हजार ७५३ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी सभागृहात सादर केला. करवाढ किंवा दरवाढ न करता विकासकामांना गती देणारा हा ‘विकासनामा’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरपरिषद निवडणूकीनंतरचा सत्ताधारी महायुतीच्या वतीने सादर करण्यात आलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. कोणतीही करवाढ किंवा दरवाढ नाही.परळीच्या सर्वसमावेशक विकासाचा संकल्प या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून सादर करून नगरपरिषदेने परळीकरांना नव्या दिशेच्या विकासात्मक वाटचालीचा विश्वास दिला आहे.
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुतीने नगर परिषदेच्या माध्यमातून परळी शहराच्या चौफेर विकासाचा ध्यास घेतलेला आहे. निवडणुकीनंतर नवीन नियमक मंडळाच्या वतीने पहिलेच अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. न.प. सभागृहात शुक्रवारी (दि.27) झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी सन 2026- 27 या वर्षासाठी चा अंदाजपत्रक आराखडा सभागृहात मांडला.
परळीकर नागरिकांना दिलासादायक अशा प्रकारचे हे अंदाजपत्रक असून करवाढ मुक्त परंतु विकासयुक्त अंदाजपत्रक असे या आराखड्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. पायाभूत सुविधा आणि सर्व समावेशक विकासाला प्राधान्य देण्याचे अभिवचन या अंदाजपत्रकातून देण्यात आले आहे.महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आलेला हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा मेळ नसून परळीच्या उज्ज्वल भविष्याचा आराखडा आहे. आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि प्रत्येक पैशाचा जनहितासाठी विनियोग या तत्त्वांवर आधारित नियोजन करण्यात आले आहे.
परळी नगर परिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा २९३ कोटी ३० लाख ३३ हजार ७५३ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये नगरपरिषदेचे नगरपालिका दर व कर,विशेष अधिनियमाखाली वसुली, नगरपरिषद मालमत्ता उत्पन्न , अनुदाने व अंशदाने, संकीर्ण उत्पन्न , असाधारण संकीर्ण जमा यामधून होणारे एकूण अपेक्षित उत्पन्न (मागील शिलकीसह) २९३.३० कोटी रुपये इतके अपेक्षित धरण्यात आले आहे. तर साफसफाई विभाग , आरोग्य व पाणीपुरवठा, रस्त्यांवरील विद्युत व्यवस्था, भालचंद्र वाचनालय व इतर वाचनालये असा मुख्य खर्चाच्या तरतुदी नुसार एकूण नियोजित खर्च २९२ कोटी ९५ लाख १४ हजार ८२० रुपये इतका होणार असून अंदाजे ३५ लाख १८ हजार ९३३ रुपयांची शिल्लक अपेक्षित धरण्यात आली आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनांतून रस्ते, सभागृहे, नाली बांधकाम, ढापे, शासकीय इमारती, नगरोत्थान योजना, अल्पसंख्यांक योजना, विशेष व वैशिष्ट्यपूर्ण योजना यांअंतर्गत दुरुस्ती व विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
शहर विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा,दर्जेदार रस्ते, दिवाबत्ती व्यवस्था, उत्तम आरोग्य या पंचसूत्रीवर आधारित नियोजन करण्यात आले असून “स्वच्छ-सुंदर- हरित परळी” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. हा अर्थसंकल्प कोणत्याही एका प्रभागापुरता मर्यादित नसून सर्व प्रभागांत समतोल निधी वाटपाचे धोरण राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नगरपरिषदेच्या उत्पन्नातील मोठा वाटा शासकीय अनुदानांचा असून, करवसुली व मालमत्ता उत्पन्नातून विकासनिधी उभारला जाणार आहे.
दरम्यान, नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिलाच अर्थसंकल्प आज सादर केला. परळीकर जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखविण्यासाठी नगरपालिकेच्या एक ना एक रुपयाचा विनियोग जनकल्याणासाठीच व्हावा असा आपला निर्धार आणि संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आजचा हा अर्थसंकल्प एक पाऊल विकासाकडे आणि एक पाऊल विश्वासाकडे नेणारा आहे. सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून शहराच्या प्रगतीसाठी सकारात्मक साथ द्यावी असे आवाहन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सभागृहात केले.सर्वांच्या सहकार्याने परळी नगरपरिषद अधिक सक्षम, समृद्ध व महाराष्ट्रात अव्वल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.