Beed Parli Attack Case
परळी वैजनाथ : तालुक्यातील दादाहरी वाडगाव येथील एका २० वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवन संपविल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२८) सकाळी उघडकीस आला. परळीतील मेरुगिरी डोंगरावरील आयटीआय महाविद्यालय परिसरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान मृत युवकाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी मुलीवर घरात घुसून हल्ला केल्या प्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तो फरार होता. दादाहरी वाडगाव येथील आकाश राम खाटीक (वय २०) असे मृत युवकाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, दादाहरी वाडगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून विळ्याने जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल झालेला होता. घटनेनंतर हा आरोपी फरार झाला होता. अल्पवयीन मुलीवरील हल्ला आणि त्यानंतर संबंधित युवकाने जीवन संपविल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.