Parli Irani Basti combing operation
परळी वैजनाथ: धारूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, बीड स्थानिक गुन्हे शाखेने परळी येथील इराणी वस्तीमध्ये मोठी कारवाई केली आहे. या 'कॉम्बिंग ऑपरेशन'मध्ये दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धारूर येथील गुन्ह्यातील आरोपी परळीच्या इराणी गल्लीत राहत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी रात्रभर इराणी वस्तीत गोपनीय माहिती काढून पहाटेच्या सुमारास अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. कंबर उर्फ डंम्बर शहाजहान इराणी (वय ४५, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर, सध्या रा. परळी इराणी गल्ली), हसनैन बरकतअली मिर्झा बेग उर्फ इराणी (वय २०, रा. भिवंडी, कल्याण) हा ठाणे जिल्ह्यातील 'मकोका' (MCOCA) गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी धारूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासह, आष्टी पोलीस ठाणे आणि शिवाजीनगर पोलीस ठाणे (बीड) येथील गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून आणखी मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहा. पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, परळीचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.