Crime News pudhari photo
बीड

Beed Illegal cattle transport in Parli| परळीत गोवंशाची निर्दयी वाहतूक; पाच जनावरे व पिकअपसह १३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Beed | परळीत गोवंशाची निर्दयी वाहतूक; पाच जनावरे व पिकअपसह १३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : गोवंशीय जनावरांची निर्दयी पद्धतीने वाहतूक केल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी कारवाई केली. जनावरांना वाहनातून दाटीवाटीने वाहून नेले जात होते. पोलिसांनी कारवाई करत पाच जिवंत बैल ताब्यात घेतले. तसेच अशोक लेलँड पिकअप वाहनही जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १३ लाख ८५ हजार रुपये आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.४० वाजता गोपीनाथ मुंडे चौक ते इटके कॉर्नर, परळी वैजनाथकडे येणाऱ्या रोडवर संशयास्पद पद्धतीने जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता एका अशोक लेलँड पिकअप वाहनामध्ये पाच जिवंत बैल आढळून आले.

जप्त करण्यात आलेल्या जनावरांमध्ये काळसर हिरव्या रंगाचा उभे शिंगे व कपाळावर पांढऱ्या रंगाचा ठिपका असलेला बैल, तांबड्या-पांढऱ्या रंगाचा बैल, काळ्या रंगाचा व त्यावर पांढरे ठिपके असलेला बैल, तांबड्या-पांढऱ्या रंगाचा आणखी एक बैल तसेच काळ्या रंगाचा व कपाळावर पांढरा ठिपका असलेला बैल यांचा समावेश आहे. या पाच जनावरांची अंदाजे किंमत ३ लाख ८५ हजार रुपये असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

याशिवाय एमएच-१४-ईएम-३२६६ क्रमांकाचा अशोक लेलँड पिकअप, अंदाजे १० लाख रुपये किमतीचा, असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. त्यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १३ लाख ८५ हजार रुपये आहे. या प्रकरणी श्याम बाबूराव झगडे (वय ४३) आणि तमीम तालिब कुरेशी (वय २८), दोघेही रा. पात्रुड, ता. माजलगाव, जि. बीड, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, जनावरांना त्यांच्या चारा-पाण्याची योग्य सोय न करता, क्रूर वागणूक देत वाहतूक केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच प्राण्यांना क्रूरतेपासून प्रतिबंध अधिनियम १९६० मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि केदार सो. यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस अंमलदार पुजरवाड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT