बीड, पुढारी वृत्तसेवा : रेशन दुकानातून धान्याबरोबरच आता अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थी महिलेला वर्षातून एक साडी मोफत दिली जाणार आहे. याकरिता बीड जिल्ह्यातून 38 हजार 886 साड्यांची मागणी केली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ओमकार देशमुख यांनी दिली.
शासनाच्या वतीने अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थी कुटूंबातील महिलांकरिता वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जानेवारी ते मार्च दरम्यान या साड्यांचे वितरण करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या संख्येनुसार जिल्हा पुरवठा विभागाने 38 हजार 886 साड्यांची मागणी नोंदवली आहे. यामध्ये तालुकानिहाय संख्या एकत्रित करण्यात आली असून ती यादी वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आली आहे. या साड्या उपलब्ध होताच वितरीत केल्या जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी ओमकार देशमुख यांनी सांगितले.