आष्टी : तालुक्यातील विविध गावांमध्ये अवैधरीत्या वाळूचा साठा करून ठेवला असल्याचे दिसून येत आहे. तर तालुक्यात सिना व कडी नदीचे पात्र मोठे असून या नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे अवैधरीत्या वाळू उपसा होत असून वाकी, चिखली, खडकत, धिर्डी, यासह काही ठिकाणी वाळूचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर होत आहे.
या वाळूचे उत्खनन करून लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू आहे. महसूल विभागाचे काही तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस विभागाचे काही कर्मचारी हातमिळवणी करून याकडे कानाडोळा करत आहेत. महसूल विभाग एखाद दुसरी कारवाई करत थोडाफार दंड वसूल करुन वाहने सोडून देत असल्याचा आरोप केला जात आहे.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वाळूने भरलेले डंपर, ट्रक्स, ट्रॅक्टर पकडल्या जातात पण त्या वाहनांवर दंड किती केला जातो याची माहिती तहसिल कार्यालयातील जमाबंदी विभागातून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील खडकत, सांगवी आष्टी, कडा, हद्दीतून जाणाऱ्या सिना, कडी, बोकडी नदीपात्रात वाळूतस्करांकडून रात्रीच्या वेळी जे.सी.बी, मशीनद्वारे सर्रास वाळूतस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.