परळी वैजनाथ : परळी वैजनाथ येथे खाजगी कामासाठी प्रवास करत आलेल्या वर्धा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा जेवताना घशात घास अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दि.१२ रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली.
वर्धा जिल्हा पोलीस दलात आष्टी जि. वर्धा येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी देवेंद्र राजाराम गुजर वय 52 वर्ष रा.आर्वी जि. वर्धा हे आपल्या खाजगी कामानिमित्त परळी परिसरात आले होते. अंबाजोगाई- परळी वैजनाथ रस्त्यावर एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी ते थांबले. जेवत असताना त्यांचा खास घशात अडकला आणि त्यांना कासावीस होऊ लागले.
तातडीने उपचारासाठी त्यांनी परळी शहर गाठले मात्र उपचार होण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती कळताच परळी पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान श्वास कोंडला व हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला आहे.