बीड

Beed News : दारू पिऊन शाळेमध्ये झोपा काढणारे 2 शिक्षक निलंबित, आष्टी तालुक्यातील प्रकार; CEOची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बीड : विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देऊन त्यांचे भविष्य घडवण्याऐवजी, शाळेतच दारू पिऊन झोपा काढणाऱ्या दोन 'बेजबाबदार' शिक्षकांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. आष्टी तालुक्यातील शंकरनगर जिल्हा परिषद शाळेतील या दोन शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जितीन रहमान यांनी मंगळवारी सेवेतून निलंबित केले.

नेमके काय घडले?

आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी केंद्रांतर्गत येणाऱ्या शंकरनगर जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे दोन प्रकार समोर आले. सहशिक्षक अनिल रामनाथ उदावंत हे १३ आणि १७ जानेवारी रोजी शाळेत चक्क झोपलेले अवस्थेत आढळले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या भेटीत हा प्रकार उघड झाला.

नशेत तर्रर्र गुरुजी

याच शाळेतील दुसरे शिक्षक मन्मथ देविदास अटकूलवाड यांनी चक्क मद्यपान करून शाळेत हजेरी लावल्याचा खळबळजनक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला.

वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली

केवळ मद्यपान आणि झोपा काढणेच नव्हे, तर हे शिक्षक वारंवार गैरहजर राहणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. प्रशासनाने यापूर्वी त्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली होती, मात्र त्यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याने अखेर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला.

निलंबन आणि मुख्यालय बदलले

महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात या दोन्ही शिक्षकांना परळी गटशिक्षणाधिकारी कार्यालय हे मुख्यालय देण्यात आले आहे.

प्रशासनाचा इशारा

शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा कडक संदेश या कारवाईतून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT