कडा : आष्टी तालुक्यात कृषी विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या ज्वारी बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या बियाण्यांपासून उगवलेली ज्वारीची अपेक्षित वाढ न होता केवळ दीड फुटांपर्यंतच वाढ झाल्याचे चित्र दौलावडगाव सह तालुक्यातील अनेक गावांत दिसत आहे. परिणामी धान्य उत्पादनासह कडबा (पशुखाद्य) उत्पन्नही पूर्णपणे हाती आले नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनावर विश्वास ठेवून कृषी विभागाकडून मिळालेली बियाणे पेरली होती. मात्र पिकांची वाढ खुंटली, कणसे नीट भरली नाहीत आणि कडबा तयार होण्याआधीच पिके निष्प्रभ ठरली अन बाटूक हातात आले. त्यामुळे रब्बी हंगाम पूर्णतः वाया गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
या नुकसानीचा फटका केवळ धान्य उत्पादनापुरता मर्यादित नसून कडबा न मिळाल्याने जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक शेतकऱ्यांना बाहेरून चारा खरेदी करावा लागत असून,त्यामुळे आर्थिक ताण अधिक वाढला आहे. कृषी विभागाने वितरित करण्यात आलेली बियाणे निकृष्ट किंवा बोगस असून त्यांची योग्य तपासणी न करता वितरण करण्यात आले. यामुळे बियाणे, मशागत,मजुरी,खते आणि इतर सर्व खर्च वाया गेला आहे.आधीच सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला असताना,वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा दुहेरी फटका बसला असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
◆संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास वेळ नसल्याचे सांगितले.
◆तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी,तसेच दोषी बियाणे पुरवठादार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेख कासम कय्युम या शेतकऱ्याने केली आहे.
◆घडलेल्या प्रकारामुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
◆“पिक नाही,कडबा नाही;गुरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर" अश्या दुहेरी संकटामुळे शेतकरी हतबल झाल्याची भावना व्यक्त करत आहेत.