Beed News: Soybean stack catches fire at Talni; loss worth lakhs
तळणी, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील तळणी येथील शेतकरी अंकुश साहेबराव गायकवाड यांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याने लाखो रुपयांचे सोयाबीन जळून खाक झाले.
तळणी येथील गट क्रमांक २४५ मधे अंकुश गायकवाड यांनी सुमारे एक हेक्टर (अडीच एकर) क्षेत्रावर सोयाबीनचे पिक घेतले होते. सोयाबीन काढणी करुन ते गंजी घालुन शेतात ठेवले असता अज्ञात व्यक्तीने सोयाबीनच्या सुडीला आग लावल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गायकवाड यांनी ही शेती ठोक्याने केली होती. दिवसरात्र मेहनत करून उभे केलेले पीक काढणीनंतर सुडीच्या रूपात सुरक्षित ठेवले होते. मात्र, आगीच्या घटनेत संपूर्ण सुडी जळून खाक झाल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तळणी परिसरातील तळेगाव, दुधा आणि तळणी येथे सोयाबीनच्या सुड्यांना आग लागण्याच्या घटना घडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे या घटना केवळ योगायोग की त्यामागे कोणाचा आहे जाणीवपूर्वक सहभाग आहे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संशय व्यक्त होत आहे. सलग घटनांमुळे रात्रीच्या वेळी शेतातील काढणी केलेल्या पिकांची राखण करण्याची वेळ आली आहे.
पोलिसांनी छडा लावावा
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल असतानाच शेतकऱ्यांनी शेताता काढून ठेवलेली सोयाबीन जाळल्या जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणी पंचनाम्याचे कागद न नाचवता, शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी तळणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.