सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचे अंबाजोगाईत पडसाद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 
बीड

Beed Protest| सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचे अंबाजोगाईत पडसाद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या; उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई : 'नीट' (NEET-UG २०२६) परीक्षा प्रकरणातील कथित पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा, तसेच लडाखमधील ज्येष्ठ सामाजिक व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाची केंद्र सरकारने तात्काळ दखल घ्यावी, या मागण्यांसाठी आज सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट (NEET-UG) परीक्षेची प्रश्नपत्रिका राजस्थानमधून फुटल्याचे समोर आले होते. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा,या मागणीसाठी अभिजित दिपके यांच्या पुढाकारातून देशव्यापी आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्याचे सलग १६ व्या दिवशी आमरण उपोषण सुरू असल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असूनही केंद्र सरकारने अद्याप या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही, अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

सोनम वांगचुक हे देशाचे मौल्यवान व्यक्तिमत्त्व असून त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि आंदोलनाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर अमर हबीब, कालिदास आपेट, सुदर्शन रापतवार, धिमंत राष्ट्रपाल, अनिकेत लोहिया, अच्चुत गंगणे,बब्रुवान पोटभरे, ॲड. अजय बुरांडे, दगडू लोमटे, प्रा. शैलेजा बरुरे, प्रा. अरुंधती पाटील, ॲड. सुनील सौंदरमल, प्राचार्य कमलाकर कांबळे, प्रा. डी. जी. धाकडे, वसंतराव मोरे आणि ॲड. अनंत जगतकर यांच्यासह अनेक जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT