केज : घुले कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मला हे मागण्याची मला मुभा आहे. लोकशाहीमध्ये जर तो न्याय मिळत नसेल तर त्याच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही. मी कोणाचं नाव घेतलं पाहिजे किंवा नाही घेतलं पाहिजे. तसेच सर्व हा तांत्रिक बाबींचा गठित केलेली विशेष तपास यंत्रणा व समिती त्याची योग्य चौकशी करेल. मात्र जर तसे झाले नाही तर मग मात्र आम्ही पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरू आणि तो आमचा हक्क आहे. असा गर्भित इशारा माजी खा. डॉ. प्रीतमाताई मुंडे यांनी विलास घुले खूनप्रकरणी दिला.
माजी खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी दिवंगत विलास घुले यांनी गुरूवारी (दि.२५) टाकळी (ता. केज) या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, हॉटेलवर सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर चाकू हल्ला करून झालेला खून अत्यंत दुर्दैवी आहे. बीड जिल्ह्यात अशा गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असल्याने त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. विलास घुले हा कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा संस्थेशी संबंध नसणारा एक साधा, सरळ माणूस होता. अशा निष्पाप व्यक्तीचा जीव जावा, हे धक्कादायक आहे.
एसआयटी योग्य तपास करेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली विशेष तपास समिती (SIT) सर्व तांत्रिक पद्धतीने विलास घुले खून प्रकरणाचा सखोल तपास करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पोलिसांच्या दिरंगाईबद्दल नाराजी
विलास घुले यांच्या अंत्यविधीला झालेल्या विलंबाबद्दल बोलताना त्यांनी पोलिसांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, आपला माणूस गेल्यानंतर निदान त्याचे अंत्यसंस्कार तरी व्यवस्थित आणि वेळेत पार पडावेत, अशी कोणत्याही कुटुंबाची भावना असते. मात्र, पोलिसांनी जर सुरुवातीला सहकार्य केले असते, तर अंत्यविधी तीन दिवस ताटकळत ठेवण्याची वेळ घुले कुटुंबावर आली नसती. पोलिसांची सुरुवातीची भूमिका पाहता त्यांनी या प्रकरणात कमालीची दिरंगाई केली हे स्पष्ट होते, असेही त्या म्हणाल्या.
आरोपी कोण आहे? हे तांत्रिक पुराव्याचे आधारे स्पष्ट होईल
विलास घुले खून प्रकरणात पुरवणी जबाबाद्वारे संशयित म्हणून खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचे नाव समोर आले आहे. या संवेदनशील मुद्द्यावर भाष्य करताना डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या की, 'खून प्रकरणात कुणाचे नाव घ्यावे किंवा घेऊ नये, यापेक्षा पोलिसांच्या तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण आणि 'SIT'च्या तपासानंतरच सर्व बाबी आणि खरे आरोपी स्पष्ट होतील.
विलास घुले यांना न्याय मिळण्यासाठी जे जे आवश्यक आहे तेथे करण्याची गरज आहे, त्याला आमचं पूर्ण समर्थन राहणार आहे. त्यांच्या कुटुंबाचा हाच प्रश्न आहे की, आमच्या लेकराचा काय दोष होता ? त्याच्यामुळे आज वेळ आली आहे. त्यांना मदत करणं आमचं कर्तव्य आहेच पण सरकारचं सुद्धा कर्तव्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते करतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.