कडा : आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपूर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या मनमानीमुळे कासवगतीने सुरू आहे. त्यातच कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता नाली दुरुस्तीच्या कामासाठी मागील आठ दिवसांपासून खोदून ठेवण्यात आल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे सरकारी दवाखान्यात कसे न्यायचे, असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.
आष्टी तालुक्यातील नगर– बीड महामार्गावरील साबलखेड ते चिंचपूर या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम मागील साडेतीन वर्षांपासून सुरू असूनही ते अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे काम संथ गतीने सुरू असून, या मार्गावर उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील व्यावसायिक व नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
दरम्यान,कडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा मुख्य रस्ता नाली दुरुस्तीसाठी खोदून ठेवण्यात आल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात नेणे कठीण झाले आहे. एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.
सध्या दवाखान्यात जाण्यासाठी कडा– धामणगाव मार्गावरून एकच अरुंद पर्यायी रस्ता उपलब्ध असून तो केवळ एखाद्या कार किंवा पायी जाण्यासाठीच योग्य आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेलाही दवाखान्यापर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी किमान दवाखान्याकडे जाणारा रस्ता तातडीने मोकळा करून रुग्णवाहिकेसाठी योग्य व्यवस्था करावी, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.