NEET paper leak file photo
बीड

Beed News | नीट परीक्षेतील कमी गुणांचे टेन्शन? परळीतील विद्यार्थी बेपत्ता; वडिलांची पोलिसांत तक्रार

नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवर वाढला माणसिक ताण

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : देशभर गाजलेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवर वाढलेल्या मानसिक ताणाचे आणखी एक चिंताजनक उदाहरण परळी वैजनाथ येथे समोर आले आहे. नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आदित्य राठोड हा विद्यार्थी घरातून निघून गेल्याची घटना घडली असून, त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

याप्रकरणी आदित्यचे वडील भगवान राठोड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद करून विद्यार्थ्याचा शोध सुरू केला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यला नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. निकाल लागल्यानंतर तो घरातून निघून गेला असून, त्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात शोध घेतला; मात्र अद्याप तो सापडलेला नाही.

नीट परीक्षा यंदा पेपरफुटीच्या आरोपांमुळे देशभर चर्चेत राहिली. या प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. शिक्षण क्षेत्रातील या घडामोडींमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याची चिंता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, परळीतील ही घटना स्पर्धा परीक्षांमधील वाढता ताण आणि विद्यार्थ्यांना मानसिक आधाराची गरज अधोरेखित करणारी ठरत आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आदित्य राठोड याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ परळी शहर पोलीस ठाण्याशी किंवा त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT