नेकनूरः नेकनूर येथे अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित होण्याच्या हालचालींना वेग आला असून लवकरच याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी आमदार नमिता मुंदडा यांच्या माध्यमातून भारत काळे यांनी सातत्याने पाठपुरावा करत शासनदरबारी विषय मांडला होता याबाबत प्रशासकीय पातळीवर आता पत्र व्यवहार सुरू झाला आहे.
नेकनूर परिसरातील नागरिकांना तहसीलसाठी दूर अंतरावर धाव घ्यावी लागत होती. जमीन फेरफार, सातबारा उतारे, उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, वारस नोंद, पीक कर्ज कागदपत्रे, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, विविध शासकीय दाखले यांसारखी महत्त्वाची कामे वेळेत न झाल्याने नागरिकांचे आर्थिक व मानसिक हाल होत होते. आता अप्पर तहसील कार्यालय नेकनूर मध्ये प्रस्तावित होत नागरिकांच्या बीड येथील चकरा वाचणार आहेत.
या कार्यालयामुळे नेकनूर सह परिसरातील तीन मंडळांना याचा थेट फायदा होणार असून, शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत, तर ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांगांसाठीही मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासन जनतेच्या अधिक जवळ येत असल्याने शासन योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.
या मागणीसाठी भारत काळे यांनी संबंधित विभागांकडे वेळोवेळी निवेदने देत लक्ष वेधले होते. अपर तहसीलच्या शासन यादीत नेकनुर चा समावेश झाला असून याबाबत लवकरच याबाबत शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.