माजलगाव : माजलगाव धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या युवा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासोबत आज जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाला तूर्त स्थगिती देण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
माजलगाव धरण परिसरातील २२ गावांतील शेतकऱ्यांनी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाविरोधात युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. धरणाची उंची वाढल्यास शेतजमिनी बाधित होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही या प्रश्नावर शेतकऱ्यांनी आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले होते.
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. धरणाची उंची वाढविण्यापूर्वी फेरसर्वेक्षण करण्यात येईल आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारेच पुढील निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत उंची वाढविण्याचा निर्णय स्थगित ठेवण्यात येईल, असे मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत सांगितल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
धरणाची उंची वाढल्यामुळे बाधित होणाऱ्या जमिनींबाबत सर्वेक्षणाची आवश्यकता असल्याचा मुद्दा यापूर्वीही समोर आला होता. गाळ सर्वेक्षण व पूर्ण संचयन पातळी (FRL) सर्वेक्षणानंतरच भूसंपादनाची आवश्यकता आहे किंवा नाही, हे स्पष्ट होईल, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली होती.
शेतकऱ्यांच्या लढ्याला महत्त्वाचे यश
धरणाची उंचीवाढीचा निर्णय झाल्यानंतर २२ गावांतील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर युवा शेतकरी संघर्ष समितीने सातत्याने आंदोलन व पाठपुरावा केला. शासनाकडून फेरसर्वेक्षण करून निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्याने समितीच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
या बैठकीस युवा शेतकरी संघर्ष समितीचे अजयसिंह राऊत, जगदीश फरताडे, मोहन जाधव, योगेश कानडे, तसेच बदामराव पंडित, माधव निर्मळ, नितीन नाईकनवरे, रुपाली कचरे, अर्जुन नाईकनवरे, विनायक रत्नपारखी, ईश्वर खुर्पे, शरद कचरे, शुभम महात्मे, गणेशराव शेंडगे आदी उपस्थित होते.