Beed News : 'Ladki Bahin' scheme installments stopped due to KYC error; Beneficiary women angry
टाकरवन, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या टाकरवन व परिसरातील अनेक महिलांचे अनुदान केवायसी आणि इतर तांत्रिक त्रुर्तीचे कारण देत अचानक बंद झाल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सुरुवातीचे काही हप्ते नियमित मिळाल्यानंतर लाभ बंद झाल्याने महिलांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राज्यात सुमारे ९० लाखांहून अधिक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची चर्चा असून, त्याचा फटका माजलगाव तालुक्यातील टाकरवन परिसरालाही बसल्याचे दिसून येत आहे. अनेक महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र, त्यानंतरही त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नसल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे.
लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, टाकरवन व परिसरातील अनेक महिलांनी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जमा केल्या. तसेच अनेकांनी स्थानिक अंगणवाडी सेविकांकडेही कागदपत्रे दिली. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अनुदान पुन्हा सुरू झालेले नाही.
याचवेळी काही कुटुंबांमध्ये एकाच रेशनकार्डवरील दोन महिलांना लाभ मिळत असल्याच्या तक्रारीही समोर येत असल्याने योजनेच्या निकषांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पात्र असूनही अनेक महिलांचे हप्ते बंद झाल्याने शासनाच्या कार्यपद्धतीबाबत महिलांमध्ये नाराजी वाढत आहे. लाभार्थ्यांचा आरोप आहे की, स्थानिक स्तरावरून मुंबई येथील महिला व बालविकास विभागाकडे अहवाल पाठविण्यात आले असले तरी वरिष्ठ स्तरावरून त्याची दखल घेतली जात नसल्याने प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत.
लाभार्थी सुनिता मुळे म्हणाल्या, "सुरू-वातीला योजनेचे हप्ते नियमित मिळाले. मात्र, अचानक केवायसीतील त्रुटीचे कारण सांगून अनुदान बंद करण्यात आले. आमच्यासाठी ही योजना मोठा आर्थिक आधार होती. शासनाने तातडीने त्रुटी दूर करून थकीत रक्कम खात्यात जमा करावी. योजनेचे सर्व निकष पूर्ण करूनही अनेक महिला लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप होत असून, पात्र महिलांची प्रकरणे तातडीने निकाली काढून थकीत अनुदान वितरित करावे, अशी मागणी टाकरवन परिसरातील लाभार्थी महिलांकडून करण्यात येत आहे.