बीड

Beed News | ‘पटवा हटवा’च्या घोषणां देत कडा शहर कडकडीत बंद! संतप्त नागरिकांचा तीव्र आक्रोश

“महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर… आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करा!”

पुढारी वृत्तसेवा

कडा : कडा शहरातील पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीने डॉक्टरने गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर शहरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून संबंधित डॉक्टरविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.“महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कोणतीही दया नको; कठोर कारवाई झालीच पाहिजे!”अशी संतप्त भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

या प्रकरणाच्या निषेधार्थ कडा शहरातील नागरिकांनी एकत्र येत आंदोलनात्मक भूमिका घेतली. “पटवा हटवा” अशा घोषणा देत नागरिकांनी संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शहरातील काही भागात दुकाने बंद ठेवूनही निषेध व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक पदावरून संबंधित व्यक्तीला हटवावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित डॉक्टरचा परवाना रद्द करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

️डॉक्टरांचा विश्वासाला मोठा डाग ?

डॉक्टरांना समाजात देवदूताचे स्थान दिले जाते. मात्र, उपचारासाठी आलेल्या तरुणीनेच गंभीर स्वरूपाचा आरोप केल्याने रुग्णांच्या आणि विशेषतः महिला रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोरात कारवाई करण्यात यावी.

️पोलीस तपासाकडे शहराचे लक्ष...

या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आता तपासातून नेमके काय निष्पन्न होते आणि संबंधितांवर पुढे कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण कडा शहराचे लक्ष लागले आहे.

नागरिकांना मोठा प्रश्न.....

“महिलांच्या सुरक्षिततेशी तडजोड चालणार नाही! उपचाराच्या ठिकाणीच महिला असुरक्षित असतील तर सामान्य नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे!”

अमोलक संस्थेची मोठी कारवाई; मानद मंत्री पदावरून निलंबन!

कडा शहरात ‘पटवा, हटवा’ आंदोलनानंतर आता श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळानेही डॉ.महेंद्र रसिकलाल पटवा यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या तातडीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार त्यांना कार्यकारी मंडळाच्या मानद मंत्री पदावरून निलंबित करण्यात आले आहे.संस्थेचे अध्यक्ष योगेश सुमतीलालजी भंडारी यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्र १ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT