गेवराई : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई बायपास परिसरात झमझम पेट्रोल पंपाजवळ बुधवारी (दि.१५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गोवंशाने भरलेला एक कंटेनर ताब्यात घेण्यात आला. या कंटेनरमध्ये २७ हून अधिक गोवंश व गायींना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता दाटीवाटीने कोंबून नेले जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती नंदी गोरक्षक दलाला मिळाली होती. त्यानंतर संशयित कंटेनरचा छत्रपती संभाजीनगरपासून गेवराईपर्यंत पाठलाग करण्यात आला. गेवराई-बीड रस्त्यावरील छत्रपती संभाजी चौक परिसरात संबंधित कंटेनर अडवून ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर वाहनासह जनावरे गेवराई पोलीस ठाण्यात आणण्यात आली.
कंटेनरमधील २७ हून अधिक गोवंश व गायींना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांना गोशाळेत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गोवंशाची अंदाजे किंमत १५ ते २० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित वाहनचालक व इतर संबंधितांविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पशुसंवर्धनाशी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास गेवराई पोलीस करीत आहेत.