बीड

गेवराईत तणाव! छत्रपती शिवरायांचा पुतळा हलविण्याच्या हालचाली; प्रशासनाविरोधात शिवप्रेमींचा एल्गार

परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यावरून शहरातील वातावरण गुरवारी (दि.२६) तापले होते. मागील आठवड्यात शिवप्रेमींनी गणिमी काव्याच्या पद्धतीने रात्रीत हा भव्य पुतळा बसवून अनावरण केले होते. या घटनेनंतर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्यानंतर शहर तसेच तालुक्यातील नागरिकांनी चौकात जाऊन छत्रपतींना अभिवादन केले होते. मात्र, संबंधित पुतळा नगरपरिषद प्रशासनाच्या परवानगीशिवाय उभारण्यात आल्याचा मुद्दा पुढे येत असून तो इतरत्र हलविण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासून मोठ्या संख्येने शिवप्रेमी एकत्र येत गेवराई पोलिस ठाण्यात गेले होते. तसेच रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले. प्रशासनाच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी राहिला पाहिजे, तो हलविण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला.

शिवप्रेमींचे म्हणणे आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याबाबत कोणताही निर्णय घेताना जनभावनांचा आदर करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रिया, परवानग्या व वाहतूक व्यवस्थेचा विचार करून निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन आणि शिवप्रेमी यांच्यात तोडगा निघतो का, की आंदोलनाची तीव्रता वाढते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

पोलिस ठाण्यावर धडकले शिवप्रेमी

गेवराई शहरात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थलांतराच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नागरिकांनी निषेध नोंदवित जोरदार घोषणा दिल्या. दरम्यान, निषेध आंदोलन अधिक तीव्र करत शिवप्रेमींनी पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळविला. छत्रपतींचा पुतळा हलविण्याचा निर्णय मागे घ्या, अशी ठाम मागणी आंदोलकांनी पोलिस प्रशासनाकडे केली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT