बीड : मागील चार-पाच दिवसांपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अतिवृष्टीमुळे शेतकर्यांवर मोठे संकट ओढावले आहे. शेतातील उभ्या पिकांसह फळबागा, घरांची पडझड, गुरेढोरे व शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खा. बजरंग सोनवणे यांनी आज (मंगळवार, दि.19 ऑगस्ट) दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकर्यांना केंद्र सरकारकडून तातडीने मदत देण्याची मागणी केली.
जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली असून नदीपात्रे तुडुंब भरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावे तसेच नदीपात्रापासून एक किलोमीटर अंतरावरील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. केज तालुक्यात मांजरा नदीचे पाणी गावात शिरून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांची पडझड तर काही ठिकाणी गुरे दगावल्याच्या घटना समोर आल्या आहेत.अतिवृष्टीच्या नुकसानीची माहिती मिळताच खा. सोनवणे यांनी नियोजित दौरे रद्द करून थेट शेतात जाऊन शेतकर्यांची प्रत्यक्ष पाहणी केली होती.
शेतकर्यांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला आणि तत्काळ पंचनामे करून मदतीसाठी मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना निवेदन पाठवले होते.आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सविस्तर निवेदन सादर करून केंद्र सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी खा. सोनवणे यांनी केली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून शेतकर्यांनी झालेल्या नुकसानीचे फोटो व व्हिडिओ जतन करून तहसील कार्यालयात लेखी तक्रार सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास माझ्या कार्यालयाशी थेट संपर्क साधून मदत घ्यावी, असे आवाहन खा. बजरंग सोनवणे यांनी केले आहे.