परळी वैजनाथ : लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवारी गोपीनाथ गडावर भाविक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा कोणतेही भव्य आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र, अत्यंत साधेपणाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमालाही जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने गोपीनाथ गड परिसर दिवसभर गर्दीने फुलून गेला होता.
याप्रसंगी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी भावूक भाषण केले. त्यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जैविक व नैसर्गिक शेती, तसेच शेतकरी आणि ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत विविध संकल्प जाहीर केले. “दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने जगा,” असा मूलमंत्र देत त्यांनी समाजहितासाठी रचनात्मक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
पुण्यस्मरणा निमित्त सकाळी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, अजय मुंडे, गौरव खाडे, आर्यमन पालवे, आगस्त्य खाडे यांच्यासह मुंडे कुटुंबीयांनी आदरांजली वाहिली. यावेळी मुंडे साहेबांना आवडणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. गडावर आयोजित भजनी मंडळाच्या कार्यक्रमातही पंकजा मुंडे यांनी कुटुंबीयांसह सहभाग घेतला.
आपल्या भाषणात वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “एक तप उलटले तरी साहेबांच्या आठवणी विसरता येत नाहीत. मुलगी म्हणून माझ्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. तुमचे प्रेम आणि विश्वास पाहून आजही माझा प्रत्येक श्वास जनतेसाठी गहाण ठेवून मी काम करत आहे.” साहेबांच्या जाण्याने झालेली हानी कधीही भरून निघणारी नसल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
पर्यावरण संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाच्या धर्तीवर पंकजा मुंडे यांनी ‘एक पेड बाप के नाम’ हा नवा उपक्रम राबविण्याची घोषणा केली. प्रत्येकाने किमान ११ झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे, तसेच कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये वृक्षारोपणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाची सुरुवात गडावरच करण्यात आली असून उपस्थित नागरिकांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.
शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी रासायनिक शेतीऐवजी जैविक व नैसर्गिक शेतीचा आग्रह धरला. “या संकल्पाची सुरुवात मी स्वतःपासून करणार आहे. शेतकऱ्यांचे जीवन जवळून समजून घेण्यासाठी मी स्वतः नांगर धरणार, ट्रॅक्टर चालवणार आणि शेती करणार आहे,” अशी घोषणा त्यांनी केली. तसेच ऊसतोड कामगारांच्या कष्टाची जाणीव ठेवून आगामी १२ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष उसाच्या फडात जाऊन ऊसतोडणी करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
आगामी नवरात्रोत्सवात आणखी एक महत्त्वपूर्ण सामाजिक संकल्प जाहीर करणार असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक सलोखा, पर्यावरण संवर्धन आणि विकासाच्या माध्यमातून समाजाची घडी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. गोपीनाथ गडाच्या उभारणीनंतर देशातील अनेक प्रमुख नेते येथे भेट देऊन गेले असल्याचे नमूद करत त्या म्हणाल्या, “अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक पक्षांचे नेते येथे आले आहेत. आता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट बाकी असून भविष्यात तेही गोपीनाथ गडावर येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष दिवंगत एजाजभाई देशमुख यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश पंकजा मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
या कार्यक्रमास महंत राधाताई सानप, आमदार नमिता मुंदडा, माजी मंत्री बदामराव पंडित, परळीच्या नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, विनोद सामत, रमेश कराड, शंकर देशमुख, गणेश हाके, प्रवीण घुगे, बाळराजे पवार, माधवराव निर्मळ, योगेश क्षीरसागर, प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.