अंबाजोगाई :- सुप्रीम कोर्टाने दिलेल्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाची राज्य सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी १५ जुलै २०२६ रोजी अंबाजोगाई येथे सकल मातंग समाजाने हजारोंच्या संख्येने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर विराट असा मोर्चा काढण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने नुकताच अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यानुसार राज्याने अ, ब, क, ड अशा उपवर्गांमध्ये वर्गीकरण करून तो निर्णय तात्काळ लागू करावा, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.
या नियोजित मोर्चा मध्ये अंबाजोगाईसह जिल्ह्यातील विविध भागांमधून मातंग समाजाचे बांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाला माजी आमदार पृथ्वीराज साठे, अजिंक्य चांदणे, लोंढे साहेब, माजलगावचे राजेश घोडे, लातूर येथून कुचेकर व त्यांचे कार्यकर्ते, नगरसेवक नाना उपाडे, मालू जोगदंड आणि त्यांचे सहकारी तसेच दलित महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बापू उदारे हे देखील मोर्चात उपस्थित होते.
मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांसाठी दलित महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बापू उदारे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी खिचडीचे वाटप केले. अंबाजोगाईतील कार्यकर्त्यांचा या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत अनेक मान्यवरांनी राज्य सरकारला उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने लागू करण्याचे आवाहन केले. जोपर्यंत हा निर्णय अंमलात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.