Beed Police 
बीड

Beed Police | स्वतःच्या खर्चातून पुलावर संरक्षक ग्रील बसवत नेकनूर पोलिसांनी लावला अपघाताला ब्रेक

संरक्षक ग्रील नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वाढला होता अपघाताचा धोका

पुढारी वृत्तसेवा

नेकनूर : पिंपळवंडी गावातील बिंदूसरा नदीवरील पुलाच्या साईडचे लोखंडी संरक्षक ग्रील अज्ञात व्यक्तीने तोडून नेल्याची माहिती नेकनूर पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली असता पाहणीदरम्यान पुलाखाली सुमारे २० फूट खोल नदीपात्र असल्याचे निदर्शनास आले.

संरक्षक ग्रील नसल्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात वाहनचालक, दुचाकीस्वार तसेच पादचारी यांचा तोल जाऊन गंभीर अपघात होण्याची व निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असल्याने नेकनूर पोलिसांनी लागलीच या ठिकाणी पाईप बसवत ग्रीलचे काम पूर्ण केले.

पिंपळवंडी ता.बीड येथील पुलावरील वाहतूक आणि ग्रील आभावी धोक्याची शक्यता लक्षात घेऊन कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट न पाहता, नागरिकांच्या जीवितास सर्वोच्च प्राधान्य देत नेकनूर पोलिसांनी स्वतःच्या खर्चातून त्या ठिकाणी नवीन संरक्षक ग्रील बसवून पुलाची सुरक्षितता तात्काळ सुनिश्चित केली.

ही कृती केवळ कर्तव्यपूर्ती नसून समाजाप्रती असलेल्या पोलिसांच्या उत्तरदायित्वाची आणि मानवतेची जाणीव करून देणारी असून नागरिकांचा जीव अमूल्य असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी नेकनूर पोलीस सदैव तत्पर असल्याचे कृतीतून सिद्ध केले .यासाठी नेकनूर ठाण्याचे सपोनि .मंगेश साळवे ,.फौ. विठ्ठल राठोड, पोलीस हवालदार उद्धव तांबे, विशाल क्षीरसागर यांनी या ठिकाणी थांबून तत्परता दाखवत ग्रीलचे काम करून घेतले आणि अपघाताला ब्रेक लावला.

पुलावरील ग्रील, रस्त्यावरील सुरक्षा साहित्य, शासकीय फलक किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे हा केवळ कायद्याने गुन्हाच नाही, तर दुसऱ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखा गंभीर प्रकार आहे. कोणीही अशा प्रकारचे कृत्य करू नये. अशा घटना निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल
--मंगेश साळवे, प्रभारी अधिकारी , नेकनूर पोलीस स्टेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT