नेकनूर : राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाला असतानाच पावसाअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्याची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील काळे वस्तीवरील शेतकरी नितीन काळे यांनी आपल्या दीड एकर शेतातील सोयाबीनचे पीक हताश होऊन जाळून टाकले. पेरणीपासून काढणीपर्यंत झालेला सर्व खर्च वाया गेला आणि हाती काहीच न आल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.
नेकनूर येथील शेतकरी नितीन शिवाजी काळे यांनी आपल्या दीड एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र मान्सूनने दडी मारल्याने सोयाबीनच्या शेंगांना दाणे भरलेच नाहीत. "पेरणी, खत, फवारणी, खुरपणी आणि नंतर काढणीसाठी लागणारे पैसेही यातून निघाले नाहीत. शेवटी हाताला काहीच लागलं नाही," अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.
सोयाबीनचे वाळलेले भुस्कट जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोगी पडले असते. मात्र ते शेतातून घरी वाहतूक करून आणायलाही परवडत नव्हते. अखेर पर्याय नसल्याने त्यांनी कष्टाने उभे केलेले पीक स्वतःच्याच हाताने जमा करून जाळून टाकले.
50 हजाराची उचल, आता फेडणार कशी?
नितीन काळे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. घरात पत्नी आणि 2 मुले आहेत. स्वतः शेतकरी असले तरी एक मुलगा कापड दुकानावर काम करतो आणि दुसरा मुलगा मिळेल ते मजुरीचे काम करतो.
सोयाबीनसाठी पैशांची जुळवाजुळव करताना कापड दुकानातील मुलाच्या मालकाकडून त्यांनी 50 हजार रुपये उचल घेतली होती. "सोयाबीन आलं की पैसे परत देऊ" असं ठरलं होतं. पण आता पीकच हाती न आल्याने ती उचल कशी फेडायची, घराचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि मुलांनी आयुष्यभर दुसऱ्यांकडे कामच करायचं का, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. "तीन-चार महिने शेतात राबतो आणि शेवटी निसर्गाच्या लहरीपणामुळे स्वतःचं पीक जाळायची वेळ येते, मग शेतकऱ्याने करायचं तरी काय?" असा सवाल त्यांनी केला आहे.
राज्याने दुष्काळ जाहीर केला, पण मदत कधी?
राज्य सरकारने नुकताच कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पंचनामे होऊन मदत हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना दिवस काढणे कठीण झाले आहे. शेतकरी संघटनांनी तातडीने या कुटुंबाला मदत मिळवून द्यावी आणि घेतलेल्या उचलीसाठी कर्जमाफी किंवा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. ही एकट्या नितीन काळेंची कहाणी नाही. दुष्काळामुळे राज्यभरातील हजारो शेतकरी आज याच परिस्थितीतून जात आहेत.