केज: बेकायदेशीर व निर्दयी पद्धतीने विनापरवाना गोवंशीय प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर नांदुरघाट पोलिसांनी कारवाई करत वाहनासह सात गोवंशीय प्राणी जप्त केले आहेत. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदुरघाट दुरक्षेत्र पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब सानप यांना मंगळवार, दि. २० मे रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो यामधून चौसाळा येथून गोवंशीय प्राणी भरून नांदुरघाट मार्गे केजकडे अवैधरित्या वाहतूक केली जात आहे.
माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सानप यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब सानप, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे, पोलिस कॉन्स्टेबल शेख रशीद व शेख पाशा यांनी नांदुरघाट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सापळा रचला.
संशयित टेम्पो येताना दिसताच पोलिसांनी इशारा करून वाहन थांबविले. चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव इस्माईल सलीम शेख (वय २८, रा. अजिजपुरा, केज) असे सांगितले. त्याच्याकडे जनावरांच्या वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर गोवंशीय प्राणी हे रियाज इकबाल खुरेशी (रा. रोजा मोहल्ला, केज) यांच्या मालकीचे असल्याची माहिती त्याने दिली.
पंचासमक्ष टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये दोन गीर, तीन खिल्लार, एक देशी गावरान व एक जर्सी अशा एकूण सात गोवंशीय गोऱ्ह्यांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गोवंशीय प्राणी व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण ५ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब सानप यांच्या फिर्यादीवरून इस्माईल सलीम शेख आणि रियाज इकबाल खुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे करीत आहेत.
गोवंशीय प्राण्यांची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी अडवल्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या काही नागरिकांनी वाहन चालक इस्माईल शेख याला बेदम मारहाण केल्याची माहिती मिळाली.