बीड ः बीड नगरपालिका उपनगराध्यक्ष तसेच स्विकृत सदस्यांची निवड गुरुवारी दुपारी नगरपरिषदेच्या स्व.गोपीनाथ मुंडे सभागृहात करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्षपदी विनोद मुळूक यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर पाच स्वीकृत सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, भाजपाचा एक व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एक अशा पाचजणांची निवड झाली. संख्याबळ असतांनाही भाजपाचा एकच सदस्य निवडला गेल्याने गटनेत्या डॉ.सारिका क्षीरसागर यांनी आक्षेप नोंदवला आहे.
बीड नगरपालिका उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडीसाठी गुरुवारी बैठक आयोजीत करण्यात आली होती. प्रारंभी शाहु, फु ले, आंबेडकर, मौलाना आझाद अघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगटाकडून विनोद मुळूक यांनी उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात भाजपाच्या गटनेत्या डॉ.सारिका क्षीरसागर यांनी अर्ज दाखल केला, परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत त्यांनी तो परत घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.
त्यानंतर स्विकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरु झाली. एकूण संख्येनुसार पहिल्या सदस्य निवडीसाठी पूर्णांकाचा विचार करण्यात आला. त्यानंतर अपूर्णांकाचा विचार करता भाजपाचे संख्याबळ दुसरा सदस्य निवडून येण्याइतके होते, असा दावा गटनेत्या डॉ.सारिका क्षीरसागर यांनी केला आहे. तरी देखील पिठासिन अधिकारी तथा नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी अधिकाराचा गैरवापर करत राष्ट्रवादी काँग्रेसचाच सदस्य निवडला असे देखील डॉ.क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
तर आज जी निवड प्रक्रिया झाली, ती सर्व नियमानुसार झाली आहे. भाजपा गटनेत्यांची जी काही तक्रार होती, ती आम्ही प्रोसेडींगवर घेतली असल्याची माहिती नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी दिली. तसेच बीडकरांनी आजवर जो विश्वास टाकला आहे, तो आम्ही सार्थ ठरवणार असल्याचे देखील मुळूक म्हणाले.
दरम्यान, याबाबत निवडीवेळी उपस्थित असलेले मुख्याधिकारी शैलेश फ डसे यांनी दिलेल्या माहितीनुसार नगराध्यक्षांनी स्विकृत सदस्य निवडीवेळी आलेल्या अर्जांपैकी अनुभवी सदस्याला प्राधान्य दिल्याचे सांगितले. तसेच याबाबत अधिकची माहिती ही नगराध्यक्षाच देवू शकतील असे फ डसे यांनी सांगितले.तर स्विकृत सदस्यांच्या निवडीवेळी कोणत्या सदस्याच्या अनुभवाचा सभागृहाला फायदा होऊ शकतो, हा निकष ठेवून या निवडी करण्यात आल्या. आज झालेल्या स्विकृत सदस्यांच्या निवडी या सर्व नियमांना अनुसरुनच झाल्या असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी दिली.
दोन्ही गट आले समोरासमोर
बीड नगरपलिकेत स्विकृत सदस्य निवडीवेळी झालेल्या गोंधळानंतर डॉ.सारिका क्षीरसागर यांच्यासह भाजपाचे सदस्य नगरपालिकेबाहेर जात असतांना दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.
भाजपा नगरसेवकांकडून घोषणाबाजी
स्वीकृत सदस्य निवडीवेळी नगराध्यक्षांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करत भाजपा गटनेत्या डॉ.सारिका क्षीरसागर यांच्यासह नगरसेवकांनी सभागृहाबाहेर पडत घोषणाबाजी केली. यानंतर काही वेळाने पुन्हा हे सर्व सदस्य सभागृहात गेल्यानंतरही घोषणाबाजी सुरूच होती.
यांची झाली निवड
स्वीकृत सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोईन मास्टर, भिमराव वाघचौरे, दिनेश मुंदडा, भाजपाकडून गोविंद शिराळे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मसूद खान यांना संधी मिळाली.