केज : केज तालुक्यातील खरमाटा येथे एका विवाहित तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. "मी तुझ्या नवऱ्यापेक्षा चांगला दिसतो, तू मला आवडतेस" असे अश्लील वक्तव्य करून तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारास खरमाटा गावातील २३ वर्षीय विवाहित महिला ही आपल्या घरासमोर कपडे धूत होती. त्याचवेळी त्याच गावातील कैलास भिवसेन पवार हा तेथे आला. त्याने त्या महिलेचा हात धरून, “तू मला आवडतेस, मी तुझ्या नवऱ्यापेक्षा चांगला दिसतो, तू माझ्यासोबत घरात चल,” असे म्हणत तिचा विनयभंग केला.
ही घटना पीडितेने आपल्या पतीला सांगितल्यावर तो आरोपीकडे चौकशीसाठी गेला असता, आरोपीने त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून कैलास भिवसेन पवार याच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार उमेश आघाव करीत आहेत.