दिंद्रुड : धारूर तालुक्यातील मोहखेड परिसरात जबरी चोरीची घटना घडली असून, चोरट्यांनी शेतकऱ्यावर चाकूने हल्ला करून सोने व शेळ्या असा एकूण सुमारे एक लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुरेशराव व रूक्मीनबाई सोळंके हे दांम्पत्य शेतकरी मोहखेड शेत शिवारात राहतात. तर त्यांचा मुलगा किसन त्याच्या पत्नी, मुलांसह दिंद्रुड येथे राहतो. किसन सोळंके यांनी शिरसाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी (दि.१६) रात्री चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत त्यांची आई रुक्मीणबाई यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडील गळ्यातील मनी मंगळसूत्र, कानातील सोन्याचे झुंबर असे सोन्याचे दागिने अज्ञात एक महिला व तीन पुरुष चोरट्यांनी लुटले. त्यानंतर शेतातील पाच शेळ्या आणि चार पिल्ले चोरून नेल्याचे समोर आले आहे. यादरम्यान सुरेशराव यांना हातपाय बांधून आखाड्यापासून काही अंतरावर फेकून दिले तर चोरट्यांना विरोध करताना चाकू हल्ल्यात शेतकरी महिला (रुक्मीनबाई) जखमी झाल्याचे सांगितले.
या घटनेत सोने व शेळ्या मिळून असा अंदाजे १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात किसन सुरेशराव सोळंके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.