Beed news 
बीड

Beed news| दोन वर्षाच्या मुलाची आई असलेली २१ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता

घरी परत येते असे सांगून गेलेली ती विवाहित तरुणी रात्री घरी परत आलेली नाही. तसेच तिचा मोबाईल बंद आहे

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : दोन वर्षाच्या मुलाला घरी ठेवून बस स्टँडला जाते असे सांगून गेलेली २१ वर्षीय विवाहित तरुणी केज येथून बेपत्ता झाली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज येथील धारूर रोड नजिकच्या भवानी नगर येथे एक कुटुंब राहत आहे. कुटुंबातील पुरुष हा ड्रायव्हर असून त्या पती-पत्नीला एक दोन वर्ष वयाचा मुलगा आहे.

२१ वर्षीय विवाहितेचा पती हा ८ फेब्रुवारी रोजी कामानिमित्त बाहेर गेला असताना, ती तरुणी तिच्या दोन वर्षाच्या मुलाला शेजारी राहत असलेल्या तिच्या दिराच्या लहान मुली जवळ ठेवून बस स्टँड वरून जाऊन परत येते, असे सांगून गेली. घरी परत येते असे सांगून गेलेली ती विवाहित तरुणी रात्री घरी परत आलेली नाही. तसेच तिचा मोबाईल बंद आहे. तिच्या पतीने आणि नातेवाईकांनी, नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती कुठेही आढळून आलेली नाही. बेपत्ता असलेल्या विवाहित तरुणीचे वय (२१ वर्ष), रंग-सावळा, शरीरबांधा मध्यम, उंची ५ फुट, अंगावर हिरव्या रंगाची साडी व राखाडी रंगाचे ब्लाऊज, गळ्यामध्ये मणी मंगळसुत्र, कानात पिवळ्या धातूचे कानातले दागिना, पायात चांदीचे चैन असे तिचा पोशाख आणि वर्णन आहे.

बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी तिच्या पतीच्या तक्रारीवरून ती बेपत्ता असल्याची नोंद केज पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे. त्याचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे हे करीत असून सदर बेपत्ता तरुणी कुणाला आढळल्यास किंवा तिच्याविषयी माहिती मिळाल्यास केज पोलिस किंवा जवळच्या पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT